पुणे जिल्ह्यातील ऊसतोड हंगाम संपला, पाच महिन्यांचा मुक्काम आटोपून ऊसतोडणी कामगार निघाले गावाकडे

पुणे : जिल्ह्यातील ऊसतोड हंगाम आता संपला असून, सर्वच कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार निवांत झाले असले तरी साखर उद्योगातील तिसरा घटक असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या जीवाला मात्र घोर लागला आहे. ऊसतोडीचा हंगाम चांगला गेला असला तरी मुकादमाकडून घेतलेली उचल फिटली नाही. आता पुन्हा गावाकडे जायचे… तिथल्या मातीशी दोन हात करायचे… पडलाच पाऊस तर ज्वारी, सोयाबीन पेरायचे… पुन्हा मुकादमाकडून उचल घ्यायची आणि कारखाना गाठायचा… हे ठरलेलेच.

पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम दि. २३ रोजी बंद झाला असून, या हंगामात कारखान्याने ७५० बैलगाडी, ३६० ट्रक-ट्रॅक्टर व २६ हार्वेस्टरच्या साहाय्याने १२ लाख ९८ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करुन १५ लाख ५५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. कारखाने बंद होऊन तीन दिवस झाले तरी ऊसतोडणी मजुरांचा पाय काही घराकडे वळेना. “गावाकडे जाऊन काय ढेकळं खायची काय? जनावरांचं काय करायचं?” अशा चिंतेत कामगार आहेत. निदान येथे थांबून जनावरांच्या पाण्याची आणि चाऱ्याची सोय तरी होतेय.

ChiniMandi WhatsApp Channel

बीड तालुक्यातील महादेव कुडके आणि सुलोचना कुडके यांनी सांगितले की, यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह सोमेश्वर कारखानाही उशिरा बंद झाला. त्यामुळे आमचा व्यवसाय चांगला झाला असून, आम्ही समाधानी आहोत. दरवर्षी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ऊस हंगाम चालतो. मात्र जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी स्वतःची ऊस गाळप क्षमता वाढवल्याने साखर हंगाम चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. इथं थांबले तर ऊसतोडणी कामगारांच्या हाताला काम मिळते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो. मात्र आता पावसाळा सुरू होण्यासाठी अजून तीन महिने कालावधी आहे. त्यामुळे गावाला गेल्यावर पाणी, जनावरांना चारा यांचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

सोमेश्वर कारखान्याने गेल्या दोन गाळप हंगामांमध्ये पाच हजार प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना विस्तार केला असून, तो साडेसात हजार प्रतिदिन गाळप क्षमतेचा केला आहे. ऊसतोडणी कामगार हा मुकादमांकडून उचल घेतो. सहा महिने ऊस हंगाम चालेल आणि घेतलेली सर्व उचल फेडली जाईल, या हिशोबाने ते काम करतात. मात्र गाळप हंगाम लवकर बंद झाल्याने अनेक ऊसतोडणी कामगारांचे उचल फेडण्याचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांसह मुकादम हे आर्थिक अडचणीत आले आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here