अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन लवकरच करण्यात येणार असून, शासनाच्या सूचनेनुसार येत्या १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांनी आतापासूनच गाळप हंगामाच्या तयारीला लागावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. ट्रक मालकांनी एकत्रितपणे केन हार्वेस्टर खरेदी करून व्यवसाय करावा. यासाठी गोदावरी खोरे केन ट्रान्स्पोर्ट कंपनी आणि गौतम केन ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही काळे यांनी सांगितले.
गोदावरी खोरे केन ट्रान्स्पोर्ट कंपनी आणि गौतम केन ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.काळे म्हणाले, ऊसतोडणी मजुरांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे गळीत हंगामात मजुरांच्या टंचाईचा सामना साखर कारखाने, ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांना करावा लागतो. या समस्येवर केन हार्वेस्टिंग यंत्रांचा वापर हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ट्रक मालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून व्यवसायाच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
सभेचे प्रास्ताविक गोदावरी खोरे केन ट्रान्स्पोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी केले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, संचालक सूर्यभान कोळपे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, राजेंद्र घुमारे, सुनील मांजरे, मनोज जगताप, सचिन चांदगुडे, दिलीपराव बोरनारे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, गंगाधर औताडे, शंकरराव चव्हाण, अशोकराव मवाळ, सुरेश जाधव, श्रावण आसने, विश्वासराव आहेर, अॅड. विद्यासागर शिंदे, तसेच गोदावरी खोरे केन ट्रान्स्पोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केन ट्रान्स्पोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी आदी उपस्थित होते.


















