नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रवासी कामगारांसाठी मोठा दिलासा देत 5 किलो क्षमतेच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या वितरणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या जाणाऱ्या या सिलेंडरच्या दैनंदिन वाटपात दुप्पट वाढ केली आहे. मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही वाढ 2 ते 3 मार्चदरम्यान प्रवासी कामगारांना दिलेल्या सरासरी दैनंदिन पुरवठ्यावर आधारित आहे. याआधी ठरवलेल्या 20 टक्के मर्यादेपेक्षा ही वाढ अधिक आहे. हे 5 किलो क्षमतेचे एफटीएल सिलेंडर संबंधित राज्य सरकारे किंवा त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तेल विपणन कंपन्या (OMCs) या प्रक्रियेसाठी लॉजिस्टिक आणि कार्यात्मक मदत करतील. विशेष म्हणजे हे सिलेंडर प्रामुख्याने प्रवासी कामगारांसाठीच वितरित केले जाणार आहेत. प्रवासी कामगार, विद्यार्थी आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांसाठी मोठा दिलासा म्हणजे आता हे सिलेंडर घेण्यासाठी कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा देण्याची गरज नाही. केवळ वैध ओळखपत्र दाखवून अधिकृत वितरकांकडून हे सिलेंडर मिळू शकतात. ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष चंद्र प्रकाश यांनी या निर्णयाचे स्वागत करत हे पाऊल दुर्बल घटकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, जे लोक नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन घेऊ शकत नाहीत, त्यांना एफटीएल कनेक्शनद्वारे मदत मिळू शकते.
स्थायी पत्त्याअभावी अडचणीत असलेले प्रवासी कामगार, घरगुती मदतनीस, विद्यार्थी आणि व्यावसायिक आता कोणत्याही प्रशासकीय अडथळ्यांशिवाय स्वयंपाकासाठी इंधन मिळवू शकतील. यासाठी अर्जदारांनी वैध ओळखपत्र आणि स्वयंघोषणा पत्र सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये ते संबंधित भागात वास्तव्यास असून सिलेंडरचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच करणार असल्याचे नमूद करावे लागेल. ही सुविधा अशा प्रवासी विद्यार्थी आणि व्यावसायिकांनाही लागू आहे ज्यांच्याकडे आधीपासून एलपीजी कनेक्शन नाही. मात्र, ही योजना केवळ घरगुती वापरासाठीच असून व्यावसायिक वापरासाठी लागू नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, एका दिवसात 90,000 हून अधिक 5 किलो एफटीएल सिलेंडरची विक्री झाली आहे. 23 मार्च 2026 पासून आतापर्यंत देशभरात सुमारे 6.6 लाख सिलेंडर विकले गेले आहेत. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठा करू नये आणि माहितीकरिता केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.


















