मॉस्को : भारत आणि रशिया युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाजूने असून, या मुद्द्यावर भारताची भूमिका मोठ्या प्रमाणात रशियाच्या भूमिकेशी जुळते, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी सांगितले. मॉस्को येथून व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना पेस्कोव्ह यांनी सांगितले की, युक्रेन संघर्षाबाबत भारताची भूमिका रशियाला माहीत आहे. तसेच या संघर्षाच्या निराकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची भारताची तयारी असल्याचे रशियाने स्वागत केले आहे.
पेस्कोव्ह म्हणाले, युक्रेन संघर्षाबाबत भारताची भूमिका आम्हाला माहीत आहे आणि ती मोठ्या प्रमाणात आमच्या भूमिकेशी जुळते. कारण आम्हालाही युक्रेन संघर्षाचा शांततापूर्ण मार्गाने तोडगा हवा आहे आणि रशिया या प्रक्रियेसाठी खुला आहे.युक्रेन संघर्षाच्या निराकरणाच्या प्रक्रियेत भारत सहभागी होण्यास इच्छुक असल्याचेही रशियाने स्वागत केले आहे, असे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांचेही रशिया स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी रशियाला हे युद्ध कधीच नको होते, असा दावा केला. यापूर्वी सुरू झालेला संघर्ष थांबवण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.पेस्कोव्ह म्हणाले, आम्हाला हे युद्ध प्रत्यक्षात कधीच नको होते. आम्ही पूर्वी सुरू झालेला संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो आम्ही सुरू केलेला नव्हता.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होणारी आगामी द्विपक्षीय बैठक युक्रेन संघर्षासह व्यापक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे पेस्कोव्ह यांनी सांगितले.या बैठकीत पुतिन युक्रेनमधील सध्याची परिस्थिती आणि युद्धाच्या आघाडीवरील घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी यांना माहिती देतील. तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
11 सप्टेंबरला मोदी-पुतिन द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता
12 सप्टेंबरपासून नवी दिल्ली येथे सुरू होणाऱ्या BRICS शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असल्याची पुष्टी पेस्कोव्ह यांनी केली. ही बैठक शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.















