नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवार रात्रीपासून देशातील सीमावर्ती भागांच्या व्यापक दौऱ्यावर रवाना होत आहेत. या बहुराज्यीय दौऱ्याचा उद्देश देशाच्या सीमा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे आणि सीमांच्या सुरक्षेसाठी कार्यरत विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करणे हा आहे. केंद्र सरकार बदलत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सीमा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री अमित शहा राजस्थान, गुजरात, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या महत्त्वाच्या सीमावर्ती राज्यांचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात २५ मे रोजी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून होणार आहे. २६ मे रोजी मंत्री अमित शहा भारत-पाकिस्तान सीमेवरील बीएसएफच्या सांचू चौकीला भेट देणार आहेत. यावेळी ते सीमारेषेवर तैनात जवानांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजातील अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेणार आहेत. याशिवाय जवानांच्या राहणीमान आणि कामाच्या सुविधा सुधारण्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. कठीण आणि दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
बिकानेर दौऱ्यात अमित शहा उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राजस्थान सरकारचे प्रतिनिधी, बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी तसेच सीमावर्ती जिल्ह्यांतील प्रशासन आणि पोलिस अधिकारी सहभागी होणार आहेत. सीमा सुरक्षा, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सीमापार धोक्यांवर नियंत्रण यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.यानंतर २९ मे रोजी अमित शहा गुजरातमधील भुज येथे जाणार आहेत. तेथे ते बीएसएफ चौकीची पाहणी करतील तसेच भारत-पाकिस्तान सीमेवरील संवेदनशील हरामी नाला परिसराला भेट देतील. कच्छच्या रणातील हा भाग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि घुसखोरीच्या घटनांमुळे संवेदनशील मानला जातो.
तसेच ५ जून रोजी त्रिपुरा येथेही अमित शहा भारत-बांगलादेश सीमेलगतच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. ईशान्य भारतात अवैध घुसखोरी आणि तस्करीसारख्या प्रश्नांमुळे या भागातील सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. जूनच्या मध्यात अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे. या दौऱ्यात ते भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा, देखरेख व्यवस्था आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा बहुराज्यीय दौरा सीमा सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या व्यापक रणनीतीचा भाग आहे. नियमित आढावा, विविध यंत्रणांमधील समन्वय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सीमावर्ती पायाभूत सुविधा विकासावर सरकारचा भर राहणार आहे. तसेच प्रत्यक्ष सीमारेषेवर तैनात जवानांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांच्या आधारे धोरणात्मक निर्णय घेण्यावरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे.


















