वॉशिंग्टन डीसी : नवीन LNG टर्मिनल्स आणि विद्यमान प्रकल्पांच्या विस्तारामुळे निर्यात क्षमता वाढल्याने अमेरिकेच्या द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) निर्यातीत २०२६ च्या पहिल्या सहामाहीत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने (EIA) आपल्या ताज्या Natural Gas Monthly अहवालात ही माहिती दिली आहे. EIA नुसार, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकेची LNG निर्यात सरासरी १७.४ अब्ज घनफूट प्रतिदिन (Bcf/d) इतकी होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही निर्यात अधिक आहे.
२०१६ मध्ये अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर LNG निर्यात सुरू केल्यानंतरची ही निर्यात वाढीची सर्वात वेगवान गती असल्याचे EIA ने म्हटले आहे. नवीन टर्मिनल्स तसेच विद्यमान सुविधांच्या विस्तारामुळे अतिरिक्त निर्यात क्षमता उपलब्ध झाली आहे. EIA च्या अंदाजानुसार, २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत अमेरिकेची LNG निर्यात सरासरी १७.३ Bcf/d, तर २०२७ च्या पहिल्या सहामाहीत ती वाढून १८.७ Bcf/d होण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG वाहतुकीत आलेल्या व्यत्ययामुळे जागतिक पुरवठ्यावरही परिणाम झाला. या व्यत्ययामुळे जागतिक LNG पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा, प्रामुख्याने कतारमधून होणारा पुरवठा, प्रभावित झाला. परिणामी LNG दर वाढले आणि आशियाई खरेदीदारांना मर्यादित स्पॉट कार्गोसाठी अधिक स्पर्धा करावी लागली. या परिस्थितीचा अमेरिकेच्या LNG निर्यातीवरही मोठा परिणाम झाला. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेतून आशियाकडे होणारी LNG निर्यात दुपटीहून अधिक वाढली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात २.३ Bcf/d किंवा १०८ टक्के वाढ झाली.
युरोपकडे होणाऱ्या अमेरिकन LNG निर्यातीतही वाढ झाली. त्यात ०.१ Bcf/d किंवा १ टक्का वाढ नोंदवण्यात आली. तर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन तसेच मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) या भागांकडे होणारी निर्यात ०.८ Bcf/d किंवा ४६ टक्क्यांनी वाढली. अमेरिकन LNG चे प्रमुख गंतव्य म्हणून इजिप्त आणि नेदरलँड्स आघाडीवर राहिले. दोन्ही देशांना प्रत्येकी सरासरी १.७ Bcf/d LNG निर्यात करण्यात आली.यानंतर इटलीला १.४ Bcf/d, फ्रान्सला १.२ Bcf/d आणि ब्रिटनला १.१ Bcf/d LNG निर्यात झाली.EIA च्या ताज्या अंदाजानुसार, अमेरिकेची वाढती LNG निर्यात क्षमता आणि मजबूत जागतिक मागणी यामुळे देशाच्या LNG निर्यातीला सातत्याने पाठबळ मिळत आहे. अतिरिक्त निर्यात क्षमता कार्यान्वित होत गेल्याने आगामी काळात अमेरिकेच्या LNG निर्यातीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.















