बिजनौर : जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ऊस सर्वेक्षण १ मे रोजी सुरू झाले. ऊस विभाग आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके ऊस सर्वेक्षणात गुंतलेली आहेत. हे सर्वेक्षण ३० जूनपर्यंत पूर्ण होईल. यांदरम्यान, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आगामी गाळप हंगामासाठी त्यांच्या ऊस लागवड क्षेत्राची घोषणा ऑनलाइन सादर करणे आवश्यक असेल. घोषणापत्रे विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जातील आणि शेतकऱ्यांना ती स्वतःच ऑनलाइन भरावी लागतील. जे शेतकरी वेळेवर त्यांचे ऑनलाइन घोषणापत्र सादर करणार नाहीत, त्यांची लागवड आगामी गाळप हंगामात कधीही रद्द केली जाऊ शकते, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऊस सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. हे ऊस सर्वेक्षण एका संयुक्त पथकामार्फत केले जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपले घोषणापत्र ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे असे जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंग यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या गाळप हंगामात ऊस लागवड क्षेत्र २,५६,००० हेक्टर होते. आता सुरू असलेल्या सर्वेक्षण मोहिमेत पथके शेतकऱ्यांनी दिलेल्या तपशिलाची १०० टक्के पडताळणी करतील. त्यामुळे ऊस सर्वेक्षण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि प्रत्यक्ष ऊस लागवड क्षेत्राचे अचूक मूल्यांकन सुनिश्चित होईल. ऊस सर्वेक्षण पथकाच्या शेतावरील आगमनाची तारीख, पथक प्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांक शेतकऱ्यांना तीन दिवस आधी एसएमएसद्वारे पाठवला जाईल असे ऊस विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.















