लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये ऊस लागवड अभियानाने गती घेतली आहे. आतापर्यंत निर्धारित १४.४८ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८.७१ लाख हेक्टर म्हणजे जवळपास ६० टक्के क्षेत्रात ऊस लागवडी पूर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत याला यंदा गती मिळाली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ७.५० लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती. लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागेल ती मदत करण्याचे आदेश ऊस मंत्र्यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच पारदर्शी ऊस बियाणे योजना राबविताना ६.९० लाख क्विंटल शुद्ध ऊस बियाणे ऑनलाइन पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात आले आहे.
ऊस मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते, किटकनाशके, कृषी यंत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. यासाठी ९४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ऊस लागवड क्षेत्राच्या मोजणीसाठी सॅटेलाइटवर आधारित पिक सर्वेक्षण अभियान राबविण्याची सूचना केली आहे. ड्रोनद्वारे ऊस पिकावर औषधे, खते, किटकनाशकांची फवारणी केल्यास उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चात बचत होईल आणि पिकांची देखभाल करणे सोयीचे ठरणार आहे. राज्यात आतापर्यंत सरकारने ३.१९ लाख कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. साखर उत्पादन आणि विक्रीतही वाढ झाली आहे. ८५८ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ८७.५६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. त्यापाठोपाठ ऊस बिलांच्या वितरणानेही गती पकडली आहे.


















