नवी दिल्ली : टोमॅटो, खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे एप्रिल 2026 मध्ये घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या खर्चात वार्षिक आधारावर 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती क्रिसिल इंटेलिजन्सच्या ताज्या ‘रोटी राईस रेट’ अहवालात देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, एप्रिल महिन्यात घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढला. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील अन्नधान्यांच्या किमतींवर आधारित हा खर्च मोजण्यात आला. धान्य, डाळी, ब्रॉयलर चिकन, भाज्या, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाक गॅस या वस्तू थाळीच्या खर्चात वाढ होण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
थाळी महाग होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे टोमॅटोच्या दरातील मोठी वाढ. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लागवड क्षेत्र घटल्याने उत्पादनात 3 ते 4 टक्क्यांची घट झाली. त्यामुळे एप्रिल 2026 मध्ये टोमॅटोचे दर 38 टक्क्यांनी वाढून 29 रुपये प्रति किलोवर पोहोचले, जे मागील वर्षी याच कालावधीत 21 रुपये प्रति किलो होते.जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरातही वार्षिक आधारावर प्रत्येकी 7 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे घरगुती स्वयंपाक खर्चात आणखी भर पडली.
कमी उन्हाळी पेरणी आणि उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेमुळे जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोचे दर वाढू शकतात. मात्र कांदा, बटाटा आणि डाळींच्या कमी झालेल्या दरांमुळे थाळीच्या खर्चातील वाढ काही प्रमाणात नियंत्रित झाली. उशिरा आलेल्या खरीप मालाचा पुरवठा, रब्बी हंगामातील उत्पादन आणि निर्यात घटल्याने कांद्याचे दर 16 टक्क्यांनी कमी झाले. रब्बी उत्पादनात 2 ते 3 टक्के वाढ झाल्याने आणि कोल्ड स्टोरेजमधील साठा बाजारात आल्याने बटाट्याचे दर 14 टक्क्यांनी घसरले. तसेच तूर डाळीच्या शुल्कमुक्त आयातीमुळे डाळींच्या दरात 4 टक्क्यांची घट झाली.
अहवालात पुढे म्हटले आहे की, ब्रॉयलर चिकनच्या दरात 2 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे मांसाहारी थाळीचा खर्च वाढला. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे कुक्कुटपालनातील मृत्यू वाढले आणि पुरवठा कमी झाल्याने चिकन महागले.मासिक आधारावर पाहता एप्रिलमध्ये शाकाहारी थाळीचा खर्च स्थिर राहिला, तर मांसाहारी थाळीचा खर्च 1 टक्क्यांनी वाढला.

















