नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत (DR) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांची महागाई सवलत मूळ वेतन आणि पेन्शनच्या सध्याच्या ६० टक्क्यांवरून वाढून ६३ टक्के होणार आहे.
या निर्णयाचा देशभरातील सुमारे ४८.५४ लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६८.७१ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.सरकारच्या माहितीनुसार, महागाई भत्ता आणि महागाई सवलतीतील या वाढीमुळे केंद्र सरकारवर वर्षाला एकूण १०,०१६.१० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा अतिरिक्त हप्ता सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित, मान्य करण्यात आलेल्या निर्धारित सूत्रानुसार मंजूर करण्यात आला आहे.
वाढत्या महागाईपासून दिलासा मिळणार
केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या खर्चात होणारी वाढ भरून काढण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे, पेन्शनधारकांच्या पेन्शन उत्पन्नावरील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी महागाई सवलत दिली जाते.ही वाढ १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. त्यामुळे पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या तारखेपासून वाढीव दरानुसार लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकार आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी वेळोवेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत सुधारणा करते. या ताज्या निर्णयामुळे दोन्ही गटांना मूळ वेतन किंवा पेन्शनच्या सध्याच्या ६० टक्के दराच्या तुलनेत ३ टक्के अधिक लाभ मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार असून, सरकारी तिजोरीवर वर्षाला १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
















