महाराष्ट्र साखर उत्पादनात यंदा दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता

पुणे : देशातील ऊस गाळप हंगामाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली असून देशभरात आतापर्यत ७७, तर राज्यात ३० कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली आहे. देशात आतापर्यंत १९७.६५ लाख टन, तर राज्यात ६८.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाशी तुलना केल्यास देशातील साखर उत्पादनात २७ लाख टन, तर राज्याच्या साखर उत्पादनात ११ लाख टनांनी घट झाली आहे. यंदा साखर उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या तर महराष्ट्र आणि कर्नाटक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार देशात २७० लाख टन उत्पादन अपेक्षित असून, गेल्या वर्षाच्या ३१९ लाख टनांच्या तुलनेत त्यात ४९ लाख टन घट होऊ शकते. राज्यात गेल्यावर्षी ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात २४ लाख टनांनी घट होऊन ते ८६ लाख टन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे साखर उत्पादनात पहिला क्रमांक असलेला महाराष्ट्र यंदा दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

देशातील एकूण कारखान्यांपैकी ४५४ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यंदा १५ फेब्रुवारीअखेर यापैकी ७७ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. देशभरात आतापर्यंत २ हजार १७५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर साखर उत्पादन १९७.६५ लाख टनापर्यंत झाले असून, गेल्यावर्षी याच तारखेला २२४.७५ लाख टन झाले आहे. यंदा त्यात २७.१० लाख टनांची घट झाली आहे. देशभरात सरासरी साखर उतारा केवळ ९.०९ टक्केच मिळाला असून, तो गेल्या हंगामात ९.८७ टक्के होता. यंदा त्यात ०.७८ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा साखर उत्पादन २७० लाख टन राहण्याचा अंदाज असून, गेल्यावर्षीच्या ३१९ लाख टन साखरेच्या तुलनते त्यात सुमारे ४९ लाख टनांची घट येण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here