पुणे : श्री छत्रपती साखर कारखाना हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीवर भर देणार

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२६-२७ करिता व्हीएसआय व पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाने छत्रपती कारखान्याने उसाचे उत्पादन व साखर उतारा वाढविण्यासाठी ऊस लागवड धोरण निश्चित केले. संचालक मंडळाच्या सभेत ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने केन हार्वेस्टर मशीनने मोठ्या प्रमाणावर उसाची तोडणी करण्याकरिता सभासदांनी जास्तीत जास्त ऊस क्षेत्र मशीनने तोडण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना करण्यात आली. त्यासाठी ऊस लागवडीमध्ये चार फूट व पाच फूट रुंदीच्या सरीचा वापर करावा तसेच पट्टा पद्धतीने उसाची लागवड करावी असे सूचविण्यात आले आहे.

श्री छत्रपती कारखान्याने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, गतवर्षीप्रमाणे गटवार तसेच गाववार लागण नोंदी घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अक्षर क्रमवारीनुसार नोंदी घेण्यात येतील. काटेवाडी, कन्हेरी या गावातील नोंद बीजेएस व बोरी या गावातील नोंद इएमव्ही या अक्षर क्रमवारीनुसार घेण्यात येतील. पट्टा पद्धतीमुळे उसाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. पट्टा पद्धतीच्या ऊस लागवडीमुळे उसावरील कीड व रोग नियंत्रण करणे सोपे जाते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांनी व बिगर सभासदांनी नोंद केलेल्या संपूर्ण उसाचे गाळप कारखाना करणार असल्याने ऊस उत्पादक व बिगर उत्पादक सभासदांनी त्यांच्या उसाची परस्पर अन्यत्र विल्हेवाट लावू नये व गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here