शेवटचा डाव… माळेगाव साखर कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी अजित पवार आणि तावरे गटाकडून निकराचे प्रयत्न सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान केले होते की, माझ्या पॅनेलच्या चेअरमनपदाचा दावेदार मी स्वतः आहे, तुम्ही तुमच्या पॅनेलच्या चेअरमनपदाचे नाव जाहीर करावे. या आव्हानाला प्रतिसाद देत सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे रंजन तावरे यांनी आमचे चेअरमन जे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवत आहेत ते सहकारमहर्षी चंद्रराव (आण्णा) तावरे असतील, असे जाहीर करताच उपस्थित सभासदांनी एकच जल्लोष केला. कारखाना निवडणूक प्रचारानिमित्त तावरे बोलत होते. माळेगाव साखर कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी अजित पवार आणि तावरे गटाकडून निकराचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. माळेगाव कारखान्यासाठी उद्या (22 जून) मतदान होणार आहे.

दरम्यान त्यापूर्वी आपल्या मार्गदर्शनात सहकारमहर्षी चंद्रराव तावरे म्हणाले, माळेगाव साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. या कारखान्याचा ऊस दर राज्याला दिशा देणारा ठरतो. कारखान्याच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी ऊस उत्पादक सभासदांना जास्तीचा ऊस दर दिला आहे. त्यामुळे खासगी साखर कारखानदारांना याचा फटका बसतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळपास १२ ते १३ खासगी कारखाने आहेत, जे इतरांचे नावे दाखवलेले आहेत. त्या कारखान्यांचे जवळपास १ कोटी मे. टन उसाचे गाळप केले जाते. अशावेळी जर आम्ही सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून खासगी साखर कारखान्यांपेक्षा ४०० ते ५०० रुपये टनाला जास्त दिले तर अजित पवारांना निदान टनाला १०० ते २०० रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. अजित पवारांचं खरं दुखणं इथं आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून त्यांना सहकार मोडीत काढायचा असून, आपले नुकसान टाळायचे आहे, असा आरोप सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.

मी कामाचा माणूस आहे, ‘माळेगाव’चं भलं मीच करणार : अजित पवार

‘मी कामाचा माणूस आहे. माझी कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दिलेला शब्द पाळणारा, अशी माझी ख्याती आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या सभासदाचे भलं मीच करणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणूक सांगता प्रचार सभेत केले. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे आदींसह बहुसंख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते. माळेगाव कारखाना राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. सत्ताधारी संचालक मंडळाने ही परंपरा कायम राखली आहे. मागील गाळप हंगामाचा उच्चांकी ऊस दर दिला आहे. अद्याप फायनल पेमेंट देणे बाकी आहे.

सोमेश्वर कारखाना माझ्या ताब्यात दिला, मी त्या कारखान्याची राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली. मात्र, विरोधक मी सहकार मोडीत काढायला निघालोय, असा आरोप करतात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मागील निवडणुकीत माझे पॅनेल निवडून दिले. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केले. असे असताना विरोधकांचे कामकाज तुम्ही पाहिले आहे. त्यांच्या चुकीच्या कामकाजाचा फटका ऊस उत्पादक सभासदांना बसला असून, सत्ताधारी संचालक मंडळाने ते सर्व दुरुस्त केले. त्यांनी केलेले कर्ज देखील फेडले. यापुढे मी माळेगाव साखर कारखान्याला सर्वतोपरी मदत करणार आहे. मीच कारखान्याचा चेअरमन होणार असल्याने चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडणार नाहीत. अत्यंत काटकसरीने पारदर्शकपणे आणि सर्वांच्या मदतीने कारखाना चालवणार आहे; जेणेकरून राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत ‘माळेगाव’ची जी उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा आहे, ती कायम राखली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here