पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. कारखान्याच्या सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प, स्पेंट वॉश ड्रायर तसेच नवीन बॉयलर आणि टर्बाइन प्रकल्पांच्या ई-टेंडर्सची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ येथे शुक्रवारी (दि. ४) राज्यस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री तथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तिन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ई-टेंडर उघडण्यात आले.
दिवंगत अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना देशातील क्रमांक एकचा सहकारी साखर कारखाना व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.आधुनिक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, आर्थिक सक्षमता आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून माळेगाव कारखान्याला देशातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना बनविण्याचे उद्दिष्ट आहे. अजित पवार यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कारखान्याने या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे, असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
प्राप्त निविदांमधील न्यूनतम दरानुसार संबंधित कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हरित ऊर्जा निर्मिती, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या दिशेने माळेगाव कारखान्याची वाटचाल अधिक मजबूत झाली आहे.विशेष म्हणजे, अशा प्रकारचे प्रकल्प राबविणाऱ्या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये माळेगाव कारखान्याने आघाडी घेतली आहे. हे प्रकल्प केवळ कारखान्याच्या आधुनिकीकरणापुरते मर्यादित नसून ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन, उपपदार्थांचे मूल्यवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरण या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे, तानाजी कोकरे, नितीन सातव, स्वप्नील जगताप, विजय तावरे, अविनाश देवकाते, विलास देवकाते, सतीश फाळके, राजेंद्र बुरुंगले, जयपाल देवकाते, देविदास गावडे, रतनकुमार भोसले, विशाल जगताप, शेखर जगताप, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि श्रीकांत पाटील यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.


















