पुणे : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सन २०२५-२०२६चे ऊस लागवड धोरण जाहीर करण्यात आले आहे. १ जुलै २०२५ पासून ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १ जुलै व १६ जुलै रोजी लागण नोंद घेण्याच्या ठिकाणी सभासदाची होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी पासून ऊस लागवड घेण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करण्यात आला आहे. दि. १ ते १६ जुलै २०२५ रोजी ऊस लागण नोंद सोडत पद्धतीने घेण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
ऊस लागण नोंद घेण्याच्या नवीन पद्धतीनुसार १ जुलै २०२५ रोजी फुले २६५ व १६ जुलै २०२५ रोजी ८६०३२ व पी. डी. एन. १५०१२ या जातीच्या ऊसाची लागवड नोंद फॉर्म त्या-त्या दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत गांववार विभागवार घेणेत येतील व त्याच ठिकाणी सकाळी ११ वाजता लागण नोंद फॉर्मची सोडत काढण्यात येईल. त्यानंतर १ जुलै २०२५ रोजी फुले २६५ या ऊस जातीचे नोंद दिलेल्या ऊस क्षेत्राची लागवड ३ जुलै २०२५ पर्यंत व १६ जुलै २०२५ रोजी ८६०३२ व पी. डी. एन. १५०१२ या ऊस जातीचे नोंद दिलेल्या ऊस क्षेत्राची लागवड १८ जुलै २०२५ पर्यंतच्या मुदतीतच पूर्ण करावी लागणार आहे.
मुदतीत लागवड पूर्ण नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आल्यानंतर ही नोंद रद्द करण्यात येणार आहे. अशा रद्द केलेल्या व लागवड होऊन कायम केलेल्या ऊस क्षेत्राची सभासदनिहाय २६५ व्हरायटीची लागण नोंदीची यादी ५ जुलैला तर ८६०३२ या व्हरायटीची व पी. डी. एन. १५०१२ या व्हरायटीची लागण नोंदीची यादी २० जुलै रोजी ग्रामपंचायत व सोसायटी ऑफिसला लावणेत येणार आहे. या दोन तारखा वगळता इतर तारखांना लागण नोंदी पूर्वीप्रमाणेच घेतल्या जाणार असल्याचेही अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी यावेळी सांगितले.