पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०१ रुपये पहिला हप्ता देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी ही माहिती दिली. यंदाच्या हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, सभासद आणि गेटकेन ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पुरवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभासदांसह गेटकेन शेतकऱ्यांनाही समान दर
कारखान्याच्या कार्यालयात अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत पहिल्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक अशोक जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी सांगितले की, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार आणि माजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मे २०२५ रोजी विद्यमान संचालक मंडळाने कारभाराची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी कामगारांचे थकीत वेतन, यंत्रसामग्रीच्या दुरुस्त्या आणि आर्थिक अडचणी अशी अनेक आव्हाने होती. या परिस्थितीवर मात करत संचालक मंडळाने २०२५-२६ चा गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत श्री छत्रपती कारखान्याच्या सभासदांना योग्य दर देण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले होते. त्यानुसार आता प्रतिटन ३,५०१ रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सभासद शेतकऱ्यांप्रमाणेच गेटकेन ऊस पुरवठादारांनाही समान दर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वजनकाट्यात पारदर्शकतेचा दावा; कामगारांना १५ टक्के बोनस
कारखान्याचा वजनकाटा अचूक आणि पारदर्शक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एक टन म्हणजे १,००० किलो या प्रमाणानुसार वजन केले जाते. ज्या वजनकाट्यावर उसाचे वजन केले जाते, त्याच काट्यावर साखरेचेही वजन केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कारखान्यातील कामगारांच्या हिताचा विचार करून दिवाळीनिमित्त १० टक्के बोनस तातडीने देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित ५ टक्के बोनस नंतर दिला जाणार असून, कामगारांना एकूण १५ टक्के बोनस मिळणार आहे.
सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल
अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. त्यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्यामुळे कारखाना आर्थिक अडचणींतून बाहेर पडून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या हंगामासाठी १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आणि प्रतिटन ३,५०१ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर झाल्याने आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आगामी गाळप हंगामाकडे लागले आहे.


















