कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याकडून प्रतिटन ३६१४ ऊस बिल जमा – अध्यक्ष के. पी. पाटील

कोल्हापूर : श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३६१४ रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात एकूण १,०२,२७२ टन उसाचे गाळप झाले असून, याची प्रतिटन ३६१४ रुपयांप्रमाणे बिलाची एकूण रक्कम ३६ कोटी ९६ लाख ११ हजार १६९ रुपये थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरवड्यात ऊस पुरवठा केला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करून घ्यावी.

कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. यावर्षीही ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी कारखाना प्रामाणिकपणे पुढाकार घेत आहे. कारखान्यात आजअखेर २८ दिवसांत दोन लाख ८ हजार ३४०टन ऊस गाळप केला असून, त्यातून दोन लाख २२ हजार २०० साखर पोती उत्पादित झाली आहेत. यंदाचा सरासरी साखर उतारा १०.८५ टक्के आहे. कारखाना सुरळीत व पूर्णक्षमतेने कार्यरत असून, दररोज सरासरी ८,००० टन ऊस गाळप सुरू आहे. गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद आणि शेतकरी बांधवांनी पिकविलेला सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही अध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here