कर्नाटक : कारदग्यातील पसारे बंधुंची कमाल, ४८ गुंठ्यात मिळवले १२६ टन ऊस उत्पादन

बेळगाव : कारदगा येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पसारे व भाऊसाहेब पसारे बंधूंनी गेली १७ वर्षे एकरी १०० टनांवर ऊस उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ही परंपरा कायम राखत यंदाही त्यांनी आपल्या ४८ गुंठे शेतीत ८६०३२ या उसाची लागवड करून २०२५-२६ गळीत हंगामात १२६ टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

विक्रमी उत्पादनाची माहिती देताना लक्ष्मण पसारे म्हणाले की, आम्ही ऊस हे नगदी पीक म्हणून घेतो. आम्ही घरचे सर्वजण शेती करत आहोत. चालू वर्षी ऊस पिकासाठी प्रथम नांगरणी करून घेतली. त्यानंतर दोनवेळा रोटर मारून सऱ्या सोडून घेतल्या. तसेच एकरी १० ट्रॉली डबे शेणखत सोडले. एक जुलैला एक डोळा पद्धत दोन फूट अंतराने ८६०३२ या जातीच्या उसाची कांडी लावण केली. टप्प्याटप्प्याने औषधे, खते दिली. ठिबकद्वारे पाणी दिले. खते, औषधे किती व कशी द्यावीत याचा पूर्ण अभ्यास करण्यात आला आहे. उसाबरोबर भाजीपाला पिकेही घेतो, असेही पसारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here