छत्रपती संभाजीनगर: येथील श्री संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकापोटी ७ कोटी ५७ लाख रुपये बँक खात्यावर वर्ग केले आहेत. १ ते १५ डिसेंबर २०२५ या तिसऱ्या पंधरवड्यात गळीतासाठी आलेल्या उसाला २८०० रुपये प्रतिटन याप्रमाणे हा पहिला हप्ता अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा शिवसेना उपनेते सचिन घायाळ यांनी दिली.
कारखान्याने केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदारांचे हितही जपले आहे. १६ ते ३१ जानेवारी २०२६ या पंधरवड्यातील ऊसतोडणी आणि वाहतुकीचे संपूर्ण बिल संबंधित मुकादम यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. यामुळे हंगाम सुरळीत पार पडण्यास मदत होत असल्याचे घायाळ यांनी नमूद केले. कारखान्याचे चेअरमन गणेश घायाळ, व्हाइस चेअरमन आबासाहेब मोरे आणि संचालक एकनाथराव नवले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे, की ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे, त्यांच्या उसाला पुढील वर्षी गळीतासाठी प्राधान्य दिले जाईल. कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस संत एकनाथ कारखान्यालाच घालावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
















