सातारा : शिवनगर-रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळपाचा नवा ऐतिहासिक विक्रम केला आहे. चालू हंगाम २०२५-२०२६ मध्ये कारखान्याने आजअखेर एकूण १३ लाख ७२ हजार मे. टन ऊस गाळप करून कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी गाळपाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
‘कृष्णा’ने फोडली ऊसदराची कोंडी…
यंदाच्या हंगामात य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वांत प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा केले होते. त्याचबरोबर कारखान्याने यंदा गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात सर्वांत पहिल्यांदा ऊस दराची कोंडी फोडली. कारखान्याने प्रति टन ३,५०० दर जाहीर केला होता. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांन स्पर्धात्मक दर देत, आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी सभासदांचे हित जपत पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले आहे.
चार साखर शाळांतील विद्यार्थ्यांना मदत…
कृष्णा कारखान्याने परिसरातील साखर शाळांतील विद्यार्थ्यांना मायेचा हात दिला. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू केल्या. सामाजिक बांधिलकी जपत या साखर शाळांतील २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

















