कोल्हापूर : दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविण्यात येतो. या प्रकल्पासाठी सच्छिद्र भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करण्यात आला असून सध्या २४ गावांत दहा हजार एकरांवर मुख्य पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी चार हजार एकरांवर पीक उत्पादन घेतले जात आहे. या पॅटर्नला केंद्र शासनाचे पेटंटही मिळाले आहे. दत्त कारखान्याच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची दखल राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतली आहे. विद्यापीठाने क्षारपड मुक्तीच्या ‘दत्त पॅटर्न’चा संशोधनात्मक अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीच्या बैठकीत हा प्रकल्प संशोधनासाठी निवडण्यात आला आहे. या संशोधनात दत्त पॅटर्न अंतर्गत सहभागी शेतकऱ्यांची वैयक्तिक, शैक्षणिक व शेतीविषयक माहिती संकलित होईल. कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीमंत राठोड आणि कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. ऋषिकेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या पॅटर्नचा अभ्यास करतील. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी वापरण्यात आलेली सच्छिद्र भूमिगत निचरा प्रणाली, रासायनिक व सेंद्रिय भू-सुधारकांचा वापर, तसेच अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांचा सखोल अभ्यास केला जाईल. याबाबत दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले की, राहुरीच्या कृषी विद्यापीठामुळे दत्तचा क्षारपड मुक्तीचा पॅटर्न देशाबरोबर जगभरही जाण्यास मदत होणार आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात, सामाजिक व आर्थिक जीवनात झालेला बदल अभ्यासला जाणार आहे.

















