पुणे : इंदापूर ऊस आंदोलनातील माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह २१ जणांची निर्दोष मुक्तता

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापुरात २०१२ साली ऊस आंदोलनातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह २१ जणांची इंदापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. १६) निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये राजू शेट्टी यांच्यासह सतीश काकडे, सदाभाऊ खोत, नीलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. इंदापुरात २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनात एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी १९ डिसेंबर २०२५ रोजी तीन गुन्ह्यांतून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर उर्वरित ५ गुन्ह्यांबाबत खटला सुरू होता. त्यातील ३ गुन्ह्यांत २१ जणांची निर्दोष मुक्तता केली असून, अद्यापी दोन खटल्यांचा निकाल प्रलंबित आहे.

२०१२ साली ऊस आंदोलनात २७०० रुपये उसाला प्रतिटन पहिली उचल द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. राज्यातील साखर कारखानदारांपैकी कोणीच उसाची पहिली उचल जाहीर केली नव्हती. त्यावेळी राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्वीकारून तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. इंदापूर न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. फारूकी यांचे कोर्टात या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज ॲड. एन. जी. शहा, ॲड. महेश ढुके, ॲड. श्रीकांत करे यांनी विनामूल्य पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here