सोलापूर : ऊसदराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांकडून घेतल्या जाणाऱ्या कथित दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरोधात शुक्रवार (ता. २०) पासून ‘काटा बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंगळवार (ता. २४) रोजी भीमानगर (टेंभुर्णी) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले. गुरुवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शेतकरी बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. मात्र, राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे जाणे कठीण असल्याने कारखानदारांनी नियोजित बैठकीच्या एक दिवस आधीच बुधवारी (ता. १८) बैठक घेतल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न घेता शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही संघटनांनी केला.
बैठकीत राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचा आणि साखर उताऱ्याचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर जिल्ह्यात एकूण ३९ साखर कारखाने असून, त्यापैकी १४ हून अधिक कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर ११ कारखान्यांचा साखर उतारा ९.७५ ते १०.७५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल देणे सहज शक्य असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
कारखानदारांची एकजूट, शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा आरोप
कर्नाटकात प्रतिटन ३,६०० ते ३,७०० रुपये, सांगली जिल्ह्यात ३,७०० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात ४,२०० रुपये, तर मराठवाड्यात ३,३५० रुपयांपेक्षा अधिक ऊसदर मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी संगनमताने प्रतिटन ३,१५० रुपयांचा दर निश्चित केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केला.राजू शेट्टी बैठकीला उपस्थित राहू नयेत, यासाठी कारखानदारांनी एक दिवस आधीच बैठक घेतल्याचा आरोपही रणदिवे यांनी केला.
कारखानदारांकडून जाणीवपूर्वक कारखाने बंद ठेवून ऊस शेतातच वाळवण्याची तसेच शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, २४ नोव्हेंबरच्या महामार्ग रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नेत्यांनी केले आहे.


















