कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या भंगार विक्री निविदेत अटी व मजकूर यामध्ये गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. कारखान्याच्या सिंचन विभागाने लोखंडी स्क्रॅप विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याचा दावा करत काही सभासदांनी कायदेशीर हरकती, स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. याबाबत सुकुमार गडगे, शिवाजी कांबळे व रमेश भूपाल चौगुले आदींनी निविदेच्या पारदर्शकतेसाठी औपचारिक नोटीस कार्यकारी संचालकांना दिली आहे.
निविदा प्रक्रियेत मालाचे प्रमाण नमूद नसणे, मालाचे तपशीलवार वर्गीकरण नसणे, राखीव किंमत व मूल्यांकन अहवाल जाहीर न करणे अशा त्रुटी आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात यावी तसेच शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून माहिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी या सभासदांनी केली आहे. दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक आय. एम. जमादार यांननी सिंचन विभागाकडील विविध प्रकारच्या स्क्रॅपचे ग्रुपिंग केलेले असून, सर्व निविदाधारकांना जागेवरती माल पाहून निविदा भरण्यास सांगितले आहे. ४९ जणांनी निविदा भरल्या आहेत. ही प्रक्रिया पारदर्शीपणे केली आहे. ज्यांना शंका असेल, त्यांनी प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

















