अहिल्यानगर : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक, संशयितास अटक

अहिल्यानगर : सन २०२५ २०२६ गळीत हंगामासाठी मजूर उपलब्ध करून देतो, असे सांगून ३८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जाधवराव चंदन परदेशी (रा. घुसर्डी खुर्द, ता. भडगाव, जि. जळगाव) या संशयिताला खर्डा पोलिसांनी अटक केली. त्याने जामखेड तालुक्यातील वाकी येथील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयिताने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून देऊन हरिदास तुकाराम शेळके, दादा सौदागर कोरडे, राजकुमार अर्जुन सावंत (रा. वाकी) तसेच वाल्मीक शंकर पवार व राहुल मनोहर रोडे यांच्याकडून रोख रक्कम आणि फोनपे, बँक व्यवहारांद्वारे वेळोवेळी एकूण ३८,१५,००० रुपये घेतले होते.

खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी पोलिस पथकासह गुप्त माहितीच्या आधारे आरोपीस नागद (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने करमाळा (जि. सोलापूर) व आष्टी (जि. बीड) येथील शेतकऱ्यांचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयिताने ऊस तोडणी मजूर आणून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात त्याने एकही मजूर न देता आरोपीने फोन बंद करून टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. संशयिताविरोधात खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here