अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने दिपावलीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रतिटन अनुदान दिले. तर कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अनुदान, शेअर्स ठेवींवरील व्याज, दिपावली साखर, पेमेंट या माध्यमातून १२ कोटी ११ लाख रुपये तर कामगारांचा बोनस १० कोटी असे २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे, असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले यांनी दिली सांगितले. दिपावलीच्या निमित्ताने हे पैसे तातडीने वर्ग करण्यास आल्याने शेतकरी, सभासद, कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्हाइस चेअरमन घुले म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी कायम सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, नागरिक, कामगारांचे हित जोपासले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सहकाराची आणि कारखान्याची वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांनी कायम शेतकरी सभासद सर्वसामान्य नागरिक महिला व युवक यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले असून दिवाळीच्या निमित्ताने ही रक्कम बँकेत वर्ग केली असल्याचे सांगितले आहे. दिवाळीला शेतकऱ्यांसाठी पेमेंट वर्ग केल्याने शेतकरी, व्यापारी, उत्पादक व कामगारांनी कारखान्याचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले.


















