अहिल्यानगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून मार्ग काढू – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अहिल्यानगर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयोजित बैठकीत शेतकरी संघटनांनी आपली भूमिका मांडली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमहापौर धनंजय जाधव, प्रादेशिक साखर उपसंचालक संजय गोंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विखे-पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात समन्वय राखून प्रश्न सोडविण्याची भूमिका शासनाची आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करून सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी कारखानदारांनी शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली असल्याची टीका केली. दुष्काळामुळे २५ ते ३० टक्के उत्पादन घटले आहे. हंगाम लवकर सुरू करून कारखान्यांनी अपरिपक्व उसाचे गाळप सुरू केले आहे. त्यामुळे चांगली रिकव्हरी मिळणार नाही. साखर ३८ रुपयांवर साखर असताना ३,२०० रुपये दर जाहीर केला. मग आता साखरेचे दर ५० रुपयांवर आहेत. मग किमान ४,००० रुपये पहिला हफ्ता जाहीर करायला अडचण काय ? असा सवाल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी केला. शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी आक्रमक भूमिका मांडत दर जाहीर करण्यास अडचण काय? असा प्रश्न केला. अशोक सहकारी कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांनी आताच दर जाहीर करणे शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी नेत्यांनी साखर कारखान्यांतील वजन काटे डिजिटल कधी होणार याचीही विचारणा केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here