छत्रपती संभाजीनगर: संत एकनाथ कारखान्यात १६ कोटींच्या अपहाराची लेखापरीक्षकांची पोलिसांत फिर्याद

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग- १) सुरेश काकडे यांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा सीए सचिन घायाळ यांनी कारखान्याची खोटी कागदपत्रे तयार करून १६ कोटी ६२ हजार रुपयांचे कर्ज उचलले. या रकमेचा अपहार करून त्यांनी साखर कारखाना व सभासदांची मोठी फसवणूक केली आहे. यामध्ये घायाळ यांच्यासह मे. सचिन घायाळ शुगर प्रा. लि. च्या इतर भागधारकांचाही समावेश आहे. घायाळ यांच्यावर या प्रकरणी गैरव्यवहार व अपहाराचा गुन्हा नोंद झाला आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर), छत्रपती संभाजीनगर यांनी सुरेश काकडे यांची कारखान्याच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्ती केली होती. यावेळी कारखाना व्यवस्थापनाने कागदपत्रे दिली नाहीत. काकडे यांनी कारखान्याचे खाते असलेल्या बँका, पतसंस्था आणि सचिन घायाळ शुगर प्रा. लि. चे तत्कालीन चेअरमन तुषार शिसोदे यांच्याकडून पत्रव्यवहार करून माहिती मिळवली. याच माहितीच्या आधारे त्यांनी आपले लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर केला. संशयितांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे कारण पुढे करून बुलडाणा अर्बन बँकेकडे कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवली. यासाठी जाणीवपूर्वक बनावट व दिशाभूल करणारी कागदपत्रे तयार केली गेली. बँकेने दिलेले कर्ज कारखान्यासाठी न वापरता परस्पर इतरत्र वळवण्यात आले. चौकशी अहवालानुसार, संत एकनाथ कारखान्याने किंवा सचिन घायाळ शुगर्सने कर्ज घेण्यासाठी शासनाची किंवा संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेतली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here