महाराष्ट्र : राज्यात 113 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला, साखर उत्पादन 950.31 लाख क्विंटल

कोल्हापूर : राज्यात 3 मार्च 2026 अखेर 1005.1 लाख मेट्रिक टन गाळप आणि 950.31 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.45 टक्के आहे. मागील हंगामात याच कालावधीत 823.31 लाख टन गाळप आणि 772.59 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. सरासरी साखर उतारा 9.38 टक्के इतका होता. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 113 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 118 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला होता.

कोल्हापूर विभागाने 209.86 लाख टन उसाचे गाळप करून 231.07 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.कोल्हापूर विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 11.01 टक्के इतका आहे. विभागात 39 पैकी 38 कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागाने आतापर्यंत 214.75 लाख टन उसाचे गाळप करून 210.72 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 9.81 टक्के आहे.पुणे विभागात 32 पैकी 18 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.

सोलापूर विभाग ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत विभागात 213.87 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 182.95 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागात 49 पैकी 26 कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागाचा उतारा 8.55 टक्के इतका आहे. अहिल्यानगर विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात कारखान्यांनी आतापर्यंत 124.58 लाख टन गाळप करून 113.02 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहिल्यानगर विभागाचा साखर उतारा 9.07 टक्के आहे. विभागात 28 पैकी 21 कारखाने बंद झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागात कारखान्यांनी आतापर्यंत 107.34 लाख टन उसाचे गाळप करून 87.31 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 8.13 टक्के इतका आहे. विभागात 25 पैकी 6 कारखाने बंद झाले असून काही कारखान्यांचा हंगाम पुढील आठवड्यात संपणार आहे. नांदेड विभागात 120.97 लाख टन उसाचे गाळप करून 113.41 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.38 टक्के इतका आहे. विभागात 30 पैकी केवळ 3 कारखाने बंद झाले आहेत. अमरावती विभागात 11.83 लाख टन उसाचे गाळप करून 11.02 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.32 टक्के आहे. नागपूर विभागात 1.89 लाख टन गाळप झाले असून 0.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 4.29 टक्के इतका आहे. विभागात 3 पैकी 1 कारखाना बंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here