सांगली: खिलारवाडी (ता. जत) येथील दीपक धानू केसरकर यांची ऊस तोडणी मजूर पुरवतो असे आमिष दाखवून तब्बल ३९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश गोविंद सावळे, खंडुजी गुलाब घोगरे (रा. साखरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच धानप्पा बिरप्पा बिरादार (रा. गुड्डापूर, ता. जत) या तिघांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकजण जत तालुक्यातील असून दोघे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आहेत. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी दीपक धानू केसरकर (वय ३७, रा. खिलारवाडी, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित गणेश गोविंद सावळे, खंडुजी गुलाब घोगरे आणि धानप्पा बिरप्पा बिरादार यांनी दीपक यांना ऊसतोड मजूर पुरवठा करून देण्याचे आमिष दाखविले. दीपक व त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रोख व फोनद्वारे व्यवहार करत एकूण ३९ लाख ४० हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात मजूर पुरवठा न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीपक यांनी जत पोलिस ठाण्यात धाव घेतली. जतचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण तपास करीत आहेत.


















