कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. त्यामुळे उसाचा खोडवा व उशिरा झालेल्या लागणी सध्या भरणीचे काम सुरू आहे. बहुतांश ऊस पट्ट्यात उसाच्या भरणाची धांदल दिसते. मात्र, गेले वर्षभर युरिया खताच्या टंचाईला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना युरियासह इतर रासायनिक खतांची गरज आहे; पण युरिया मिळेना झाला आहे. खत विक्रेत्यांकडे हेलपाटे मारून शेतकरी वैतागले आहेत. इस्रायल-इराण युद्धामुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. युरिया तयार करण्यासाठी गॅसची गरज असते. त्याचबरोबर समुद्री वाहतूक विस्कळीत झाल्याने खत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे ही परिस्थितीत ओढवल्याचे सांगण्यात येते.
कृषी सेवा केंद्रातून रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनच्या द्वारेच करणे बंधनकारक आहे; पण काही विक्रेत्यांची मशीन चालत नसल्याने त्याशिवाय विक्री केलेली आहे; पण शासनाकडे त्यावरील विक्री नोंदवली गेली नसल्याने युरिया शिल्लक दिसतो; पण प्रत्यक्षात विक्रेत्यांच्या गोडावूनमध्ये ठणठणाट आहे. ऊस पिकासहउन्हाळी भुईमूग, भात वाढीच्या अवस्थेत असताना युरियाची टंचाई भासत आहे. यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. उसाची भरणीही खोळंबली आहेत. याबाबत शेतकरी जोतिराम खाडे यांनी सांगितले की, सरकारचे अनुदान असलेली खतांची टंचाई आहे. इतर खते मुबलक असली तरी त्यांचे दर गगनाला भिडले आहेत.


















