कोल्हापूर: आजरा तालुक्यातील बेलेवाडीत येथील प्रगतिशील शेतकरी मारुती केसरकर गेली १० वर्षे आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग राबवितात. हंगामानुसार बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक घेण्याचा त्यांचा हातखंडा आहे. यंदा जपानी उसाची रोपे तयार करण्याचा निर्णय केसरकर यांनी घेतला. त्यांच्या पुढाकारातून तालुक्यात पहिल्यांदाच ही लागवड होत आहे. त्यामुळे आजऱ्याच्या मातीत जपानी शेतपिकाचे संशोधन रुजण्यास मदत होणार आहे. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आणि कमी पाण्यावर वाढणाऱ्या जपानी उसाची लागवड ते करीत आहेत. यावर्षी या रोपांची शेतात लावण करून पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात रोपे विक्रीस ठेवणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. पट्टणकोडी (ता. चिकोडी) येथील शेतकरी लक्ष्मण नाईक यांनी दोन वर्षांपूर्वी जपानमधून विमानातून उसाची रोपे आणून त्यांची दोन एकरांवर लागवड केली.
केसरकर यांनी पट्टणकोडीचे शेतकरी लक्ष्मण नाईक यांनी केलेल्या जपानी ऊस लागवडीची माहिती घेतली. जपानमधील ओसाका ते हिरोशिमा या पट्ट्यात ऊस पिकाची लागवड केली जाते. हा ऊस रोगाला कमी प्रमाणात बळी पडणारा आहे; शिवाय कमी पाण्यावर अधिक दर्जेदार उत्पादन मिळते. केसरकर यांनी नाईक यांच्याकडून महिन्याभरापूर्वी नऊ टन ऊस खरेदी केला. तो बेलेवाडीत आणून त्याच्या डोळ्यांपासून ४० हजार रोपे तयार केली. आता ही रोपे लावणीसाठी तयार झाली आहेत. परिसरातील अनेक शेतकरी येऊन माहिती घेऊन रोपे खरेदी करीत आहेत. आतापर्यंत पाच हजार रोपांची विक्री झाली आहे. याबाबत कृषी सहाय्यक शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, जपानी कृषी तंत्रज्ञान नावाजलेले आहे. केसरकर यांच्या जपानच्या ऊस रोपांमुळे कृषी तंत्रज्ञान आजन्याच्या मातीत रुजविण्यास सुरुवात होईल. उसाच्या नवीन जातीचा अनुभव या परिसरातील शेतकऱ्यांना अनुभवण्यास मिळेल.


















