‘व्हीएसआय’ची भरारी; शेतकऱ्यांना ऊस संशोधनापासून एआय, ड्रोन तंत्रज्ञानापर्यंत मार्गदर्शन

पुणे : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) गेल्या पाच दशकांपासून कार्यरत आहे. संशोधन संस्था आणि प्रत्यक्ष शेती यांच्यातील अंतर कमी करून आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित ऊस वाण, शास्त्रीय शेती पद्धती आणि तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेने केले आहे. बदलते हवामान, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेतीला नवी दिशा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे असे, पंढरपूर येथील श्रीविठ्ठल कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. गणेश पवार यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

१९७५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने सुरुवातीपासूनच ऊस संशोधन आणि साखर उद्योगाच्या विकासाला प्राधान्य दिले. वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक कार्याचा विस्तार झाला. ऊस वाण संशोधनासाठी आंबोली येथे २००६ मध्ये प्रजनन केंद्र उभारण्यात आले. येथे सुमारे १,५०० ते २,००० देशी-विदेशी ऊस प्रजातींचे संगोपन आणि नवीन वाणांच्या पैदाशीचे काम केले जाते. संशोधनाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी १९९० पासून ‘ऊस शेती ज्ञानयाग’ प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. २००६ पासून महिला शेतकऱ्यांसाठी ‘ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. ऊस परिषदा, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिक प्लॉट आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. उती संवर्धित रोगमुक्त ऊस रोपे, जैवसंजीवके आणि विविध निविष्ठांच्या माध्यमातूनही उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

आता संस्थेने डिजिटल तंत्रज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ऊस पिकामध्ये एआयच्या वापराचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. ड्रोन आणि आयओटीच्या मदतीने पिकांची माहिती संकलित करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, यावर भर दिला जात आहे. ऊस शेतीपुरते मर्यादित न राहता शुगर टेक, शुगर इंजिनिअरिंग, अल्कोहोल टेक आणि इथेनॉल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही संस्थेने कार्य विस्तारले आहे. साखर कारखान्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तांत्रिक सेवा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘संशोधनातून समृद्धी’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत ऊस उत्पादकांची शाश्वत समृद्धी आणि साखर उद्योगाची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी संस्थेची वाटचाल सुरू आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here