छत्रपती संभाजीनगर : उसाची थकबाकी ३० मार्चपर्यंत न मिळाल्यास शेतकरी करणार ‘दवंडी आंदोलन’

छत्रपती संभाजीनगर : जय हिंद शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३० मार्चपर्यंत थकीत उसाचे पैसे देण्यात यावेत; अन्यथा ३० मार्च रोजी कारखान्याच्या गेटवर दवंडी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. तसेच, पेमेंट मिळेपर्यंत सहकुटुंब अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा निर्धार ऊस उत्पादक शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, दादा पाटील चव्हाण, बाळासाहेब शिंदे, इम्रान पठाण यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दैनिक ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला आहे.

गंगापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १ जानेवारी २०२६ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत जय हिंद शुगर कारखान्याकडून उसाचे लाखो रुपयांचे पेमेंट थकीत आहे. त्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उसाची तोड होऊन तीन महिने उलटूनही पैसे न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती थकबाकीत गेली असून खासगी सावकारांचा तगादा वाढला आहे. जय हिंद शुगर कारखान्याने ऊस अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची पिळवणूक केल्याबद्दल कारखान्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने प्रादेशिक साखर संचालक, तहसीलदार, कारखाना प्रशासन व संबंधित पदाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here