लखनऊ: उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण आजीविका मिशन (UPSRLM) ने रविवारी ऊस विभागासोबत सामंजस्य करार करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाचा उद्देश शेतीत, विशेषतः ऊस उत्पादनात महिलांचा सहभाग वाढवणे हा आहे. या कराराद्वारे महिलांच्या स्वयं-साहाय्य गटांना ऊस आधारित उपजीविकेशी जोडण्यात येणार असून, त्यांच्या उत्पन्नात आणि आत्मनिर्भरतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
सध्या राज्यातील 47.5 लाख ऊस शेतकऱ्यांमध्ये सुमारे 2.9 लाख महिला आहेत. सुमारे 3,000 स्वयं-साहाय्य गटांमध्ये संघटित 57,000 पेक्षा अधिक महिला आधीपासूनच सुधारित ऊस रोपे तयार करण्याचे काम करत असून नव्या वाणांच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, या उपक्रमांतर्गत महिलांची भूमिका केवळ रोपे तयार करण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर त्यांना प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय उत्पादने निर्मिती, गूळ उत्पादन आणि इतर मूल्यवर्धित उपक्रमांसाठी प्रशिक्षण व सहाय्य दिले जाणार आहे. ‘टीओआय’शी बोलताना एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईलच, शिवाय महिलांसाठी नव्या रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.


















