सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर गेली दहा वर्षे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची सत्ता असून अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कृष्णा बँकेचे अध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरू आहे. सध्या कारखान्याच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कारखान्याची सुधारित मतदार यादीच अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मे अथवा जून महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचे केलेले विस्तारीकरण, चांगला ऊस दर, ऊसतोडीतील सुसूत्रता, पाणी योजनांचे आधुनिकीकरण, सभासद, कामगारांचे प्रश्न मार्गी या मुद्द्यांवर पुन्हा एकदा सहकार पॅनेल निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे; तर विरोधी संस्थापक पॅनेलनेही सभासदांचा मेळावा घेऊन निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
सध्या सत्ताधारी व विरोधी पॅनेलकडून साखरपेरणी सुरू आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात. खानापूर तालुक्यातील काही गावांतही सभासद आहेत. सर्वाधिक सभासद कराड तालुक्यात आहेत. एकूण ४२ हजार सभासद कारखान्याचे आहेत. गेल्या ३७ वर्षांच्या इतिहासातील निवडणुकांतील मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढत २०२१ मध्ये कारखान्यावर सत्ताधारी पॅनेलने प्रथमच सुमारे १० हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. यावेळी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते करणार असल्याची चर्चा आहे.


















