जमखंडी : बागलकोट जिल्ह्याच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची उसाची बिले तात्काळ द्यावीत, यासाठी सरकारी प्रशासनाने हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. थकीत ऊस बिले तातडीने मिळावीत या मागणीसाठी जमखंडीत शेतकरी संघटनांच्यावतीने तालुका सौधसमोर रात्रभर धरणे आंदोलन सुरू केले. उसावर ५० रुपयांच्या प्रोत्साहनपर रकमेव्यतिरिक्त कारखान्यांनी १०० रुपये द्यावेत, अशी मागणी शेतकरी नेते सिद्धप्पा बनजनावर, कल्लाप्पा बिरादर यांच्यासह शेतकरी नेत्यांनी केली आहे.
बागलकोट पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या येणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे ते म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस पुरवून अनेक महिने उलटले असले तरी अद्याप बिल मिळालेले नाहीत. वारंवार विनंती करूनही थकित रक्कम दिली जात नसल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनात चिन्नाप्पा पुजारी, मल्लप्पा अंगडी, किरण कवट कोप्प. राजू नदाफ, तुकाराम मॅगीनमनी, अजय कुलकर्णी, कुमार पवार, सिद्धानगौडा पाटील, श्रीशैला देसाई, शिवलिंग तुबची, श्रीशैला भुमार, हनुमंत मगदूम आदींसह शेतकरी सहभागी झाले.


















