लातूर : नांदेड विभागातील लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये यंदा साखर उद्योगाची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. विभागातील ३० साखर कारखान्यांनी मिळून १,२६ ,०५,९०३ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. या कारखान्यांनी १,१९,०२,७७२ क्विंटल साखर उत्पादन घेतले. मराठवाड्यातील २०२५-२६ चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोचला आहे. विभागातील ऊस गाळप जवळपास संपले असून मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच कारखाने बंद झाले आहेत. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.४५ टक्के राहिला आहे.
साखर आयुक्तालयाकडील २९ मार्चअखेरच्या अहवालानुसार गाळप व साखर उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या हंगामात साखरेचे चांगले उत्पादन झाले असून मराठवाडा उत्पादनात आघाडीवर आहे. लातूर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी ५५,३१,२५० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून ५२,२४,८९७ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.५८ टक्के आहे. परभणी जिल्ह्यातील कारखान्यांनी ३३,०३,०१८ मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून ३०,३१,४५५ क्विंटल साखर उत्पादन झाले. हिंगोली जिल्ह्यात ५ कारखान्यांनी १६,३६,८३७ मेट्रिक टन ऊस गाळप करत असून १५,८०,१३० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नांदेड जिल्ह्यात ६ कारखान्यांनी २१,३४,७९९ मेट्रिक टन ऊस गाळप करून २०,६६,२९० क्विंटल साखर उत्पादन घेतले.


















