कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी-कासारी कारखान्याने हंगाम २०२५-२६ मध्ये ४ लाख ८८ हजार ८७० मेट्रिक टन ऊस गळीत करून सरासरी १२.५५ टक्के उताऱ्यासह ६ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. हंगाम सुरुवातीपासून ते १५ जानेवारीअखेर गाळपासाठी आलेल्या उसाची यापूर्वीच एफआरपीप्रमाणे ऊसबिले अदा केली आहेत. आता उर्वरीत ऊस बिले अदा करण्यात आली असून उसाची प्रतीटन ३,५६० रुपयांप्रमाणे १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, कारखान्याने दि. १६ जानेवारी ते हंगाम संपेपर्यंतच्या गळितास आलेल्या १,६५,१५० मे. टन उसाच्या बिलाचे ५८ कोटी ७९ लाख ३७ हजार रुपये मंगळवारी, दि. ३१ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. उसाचे एफआरपीप्रमाणे एकूण १७४ कोटी ३ लाख ८० हजार रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत असे आमदार नरके यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे यांसह सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.


















