पुणे : देशात यंदा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ३५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ३१ मार्चअखेर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे. देशातील सर्वात जास्त साखर उत्पादक राज्यापैकी महाराष्ट्रात ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. मात्र, हे उत्पादन १०० लाख टन होईल अशी अपेक्षा आहे. तर देशात हे उत्पादन ३१५ लाख टनापर्यंत जाईल. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात पुढीत ८ ते १० दिवसांत हंगाम संपेल. देशातून यंदा सात ते आठ लाख टन साखर निर्यात, तर ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे.
यंदा गाळपास आलेला ऊस जवळपास संपला आहे. तर यापुढील गाळपातून साखर उतारा चांगला मिळत नाही. परिणामी उत्पादनात घट होणार आहे. महाराष्ट्रात ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. यंदा २१० कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली. त्यापैकी १८७ कारखाने बंद झाले असून, उर्वरित २३ कारखाने पुढील ८ ते १० दिवसांत बंद होतील, अशी स्थिती आहे. आतापर्यंत १ हजार ४३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ९८ लाख ८७ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ९.४८ टक्के मिळाला आहे. राज्यात पुढील १० दिवसांत गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. या विभागात २३ लाख १९ हजार टन उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशातही यंदा १०५ लाख साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हे उत्पादन ९३ ते ९३ लाख टनांपर्यंतच पोहोचेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.


















