बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत. शेतकरी संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार, राज्यातील ८१ साखर कारखान्यांकडे सुमारे ४७५६ कोटींचे ऊस बिल थकीत आहेत. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील २७ कारखान्यांकडे तब्बल १५५४ कोटी ४७ लाखांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकीत ऊस बिलांप्रश्नी पंधरा दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घालत आंदोलन केले होते. तर, कृषी समाज शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे. यावर त्वरित निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही फारशा हालचाली नसल्याने शेतकरी संतप्त होत आहेत. राज्यभरात अशीच स्थिती असल्याने या मुद्यावरून आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
यापूर्वी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेनेतर्फे साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते. शनिवारी कृषी समाज शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन कारखान्यांकडे शेतकऱ्यांची असलेली थकीत बिले तत्काळ देण्याची मागणी केली. भारतीय कृषिक समाज शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन दिले. संघटनेने आठवड्याभराचा अल्टिमेटम दिला आहे. मुदतीत पैसे जमा न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संघटनेचे महांतेश कमत म्हणाले की, कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते दैनंदिन गरजांसाठीही त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत. प्रशासनाने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा.


















