घाटनांदूर : येथून एका ऊसतोड कामगार मुकादमाचे कारखान्याच्या उचलीच्या वसुलीसाठी (ता .४) शनिवारी दुपारी १ वाजता अपरहण केल्याची घटना घडली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यचे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने दिले आहे. पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, साखर कारखान्याला ऊसतोड कामगार पुरविणारा ऊसतोड मुकादम बापूराव देवराव चव्हाण (रा. मुरंबी तांडा ता.अंबाजोगाई) यांचे कारखान्याच्या उचलीची वसुलीसाठी शनिवारी दुपारी ही घटना घडली.
चव्हाण हे मोटारसायकलवरून शासकीय गोदाम परिसरात आले असता पांढऱ्या कारमधून आलेल्या अंकुश हरिराम ढावरे (रा. होळ ता. केज) व इतर तीन जणांनी मिळून बापूराव चव्हाण यांना उचलून कारमध्ये टाकून अपहरण केले. याप्रकरणी गंगाबाई बापूराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक असद शेख करत आहेत.


















