सोलापूर : जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात १ कोटी ५९ लाख ६९ हजार ७१० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी आतापर्यंत शेतकऱ्यांना ३,७५५ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणावर थकबाकी बाकी आहे. गाळप हंगाम संपून एक ते दोन महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत. साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊस दरानुसार, २९ कारखान्यांकडे तब्बल ८७६ कोटींची ऊस बिले थकीत आहेत. तर मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार एफआरपीप्रमाणेही २३ कारखान्यांकडे ४१५ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांचा ऊस जाऊन तीन महिने झाले आहेत. अद्याप ऊसबिले मिळाली नाहीत.
जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी गळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊस दरासाठी आंदोलने केली. त्यामुळे कारखान्यांनी २७०० ते ३०२५ रुपये यांदरम्यान ऊसदर जाहीर केला. मात्र अंतिम एफआरपी २२०० ते २८५० रुपयांदरम्यान आहे. त्यामुळे कारखान्यांनी जाहीर केलेल्या दराप्रमाणे उसाचे पैसे देण्याऐवजी एफआरपी देण्याचा मार्ग पत्करला आहे. कारखाने इथेनॉलसह विविध उप उत्पादनांतून उत्पन्न मिळवतात. मग पैसे द्यायला उशीर का, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. तुंगत (पंढरपूर) येथील शेतकरी सचिन सवासे म्हणाले की, १२ डिसेंबरला ऊस गेला. तेव्हापासून आमची बिले मिळालेली नाहीत. कारखान्यावर गेलो की दोन दिवसांनी देतो, चार दिवसांनी देतो, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे येथील शेतकरी प्रताप महालव यांनीही अशीच खंत व्यक्त केली. कारखानदार ऊसबिले थकवून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.


















