सातारा : कराड येथील प्रीतिसंगमावर ऊस वाहतूकदारांनी छेडलेल्या आंदोलनानंतर आता शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुकादमांकडून झालेल्या लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणांमध्ये न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी वाहतूकदारांनी उभारलेला लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनादरम्यान मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कठोर कारवाई, बुडालेली रक्कम परत मिळवून देणे, तसेच या प्रकरणांसाठी स्वतंत्र फास्टट्रॅक न्यायालय स्थापन करणे यांचा समावेश आहे.
संबंधित विभागांकडून ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे उस वाहतूकदार संघटनांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातील विविध संघटना एकत्र येत असल्याने या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.येत्या ऊस हंगामापूर्वीच ठोस उपाययोजना करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

















