सोलापूर : भैरवनाथ शुगर प्रशासनाने प्रतिटन २०० रुपये थकीत ऊसबिल देण्याचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत बिलाच्या मागणीसाठी मंगळवारी शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी बुधवारपासून प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे थकीत रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात पैसे जमा न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी ऊस वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी मरवडे येथे हे आंदोलन केले. याप्रश्नी १२ नोव्हेंबर रोजी बेमुदत गव्हाण बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भैरवनाथ शुगरने गतवर्षी साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. प्रतिटन तीन हजार रुपये दर देण्याचे लेखी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात २८०० रुपये दराने बिल अदा करण्यात आले. त्यामुळे प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांचे सुमारे सात कोटी रुपये थकीत असल्याचा दावा युवराज घुले यांनी केला. जर कारखान्याने ११ नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा न झाल्यास १२ नोव्हेंबरपासून दुपारी १२ वाजता लवंगी कारखान्यावर बेमुदत गव्हाण बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वतः लवंगी येथे भेट देणार आहेत असे सांगण्यात आले. पोलिसांच्या विनंतीनंतर वाहतूक रोखण्याचे आंदोलन स्थगित करून कारखान्याचे शेती अधिकारी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रणजित पवार, अमोल घुले, अजय गवळी, नाथा यवळे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

















