सांगली : ऊस गाळप झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असतानाही कारखानदारांकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. उसाचा गळीत हंगाम संपून दीड ते दोन महिने उलटून गेले, मात्र अद्यापही सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे सुमारे १८० कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. गेल्या वर्षी एफआरपीचे तुकडे केल्याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले होते. व्याजासह रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. आता थकीत एफआरपीबाबत कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्तीचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यात बेदाणा, द्राक्ष तसेच रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्यावर्षी अतिवृष्टी व अपुरा सूर्यप्रकाश यामुळे द्राक्ष वाढीवर परिणाम झाला. गारपिटीने मोठे नुकसान झाले. सरकारने मदतीची घोषणा केली, मात्र, कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामेही सुरू केले नाहीत. शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्याची स्थिती आहे. साखर कारखान्यांकडील एफआरपी आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी, अन्यथा कारखान्यांविरोधात आंदोलन उभारणार आहे.


















