सोलापूर : जिल्ह्यात गाळप हंगाम सुरू होऊन २० दिवस उलटले आहेत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांना ऊस दर जाहीर करण्यासाठी दिलेली चार दिवसांची मुदतही शुक्रवारी (ता. ६) संपली. मात्र कारखानदारांनी किती दर देणार, हे स्पष्ट केलेले नाही. कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातील ऊस दराची कोंडी फुटली आहे. कोल्हापूरमध्ये ४,२०० रुपये आणि कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील कारखानदारांकडून ३,६०० रुपये दर जाहीर झाला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांचे मौन अद्याप कायम आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतच गाळप बंद पाडण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातही प्रतिटन ३,५०० रुपये दर मिळावा, अशी मागणी आहे.
साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवावी, अशी मागणी कारखानदार करतात. याच मागणीला पाठिंबा मिळवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या भेटी घेतल्या; मात्र तेच कारखानदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. साखरेच्या दरात आपोआप वाढ झाली असताना त्याचा लाभ घ्यायचा आणि शेतकऱ्यांना मात्र योग्य ऊसदरापासून वंचित ठेवायचे, असा दुहेरी डाव कारखानदार खेळत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रविवारी राजू शेट्टी पंढरपुरात येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी दिली. सध्या दुष्काळाची छाया असून पाण्याअभावी ऊस जळू लागला आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धरणातील वीज अन् पाण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे शेतकरी ऊस लवकर जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यातूनच दराबाबत चालढकल सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.


















