सातारा : शेतकऱ्यांच्या घामाला दाम देण्याचे ऐतिहासिक काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केले आहे. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये पुरवठा केलेल्या ऊसाचे प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे संपूर्ण ऊसबिल ₹४९६.७६ कोटी शेतकरी बांधवांना अदा करण्यात आलेले आहेत. तसेच आत्तापर्यंत सभासदांना मोफत साखरेचे वाटप (८.९९ कोटी) १४,१९, ३०८ मे. टन उसाचे यशस्वी उच्चांकी गाळप असे एकूण ५०५ कोटी ७५ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या हातात देण्यात कारखाना प्रशासन यशस्वी झाले आहे.
‘कृष्णा’कडून साखर शाळांतील विद्यार्थ्यांना मदत
कारखान्याने परिसरातील साखर शाळांतील विद्यार्थ्यांना मायेचा हात दिला. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू केल्या होत्या. सामाजिक बांधिलकी जपत या साखर शाळांतील २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते.. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करत सामाजिक भान जपले गेले.
यंदा उच्चांकी १४.१९ लाख टन ऊस गाळप
ऊस उत्पादनवाढ, आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सर्वांगीण प्रगती झाली आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याने इतिहासातील विक्रमी, १४ लाख १९ हजार ३०८ टन उसाचे गाळप केले. यावर्षी शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, कंत्राटदारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला.


















