पुणे : जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामात ११६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ११४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामात सहभागी छत्रपती, सोमेश्वर, व्यंकटेश, भीमाशंकर, संत तुकाराम आणि श्रीनाथ या कारखान्यांनी आपली एफआरपी दिली आहे. मात्र, इतर सात कारखान्यांकडे उसाच्या एफआरपीची १६१ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे.
साईप्रिया ग्रुपने चालवायला घेतलेल्या भीमा पाटसने २८ कोटींची देणी थकवल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. तर प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या छत्रपती आणि नीरा-भीमा कारखान्यांनी मात्र शंभर टक्के एफआरपी दिली आहे. पराग व दौड शुगरकडे काही प्रमाणात देणी राहिली आहेत. मार्च अखेरीस माळेगाव, बारामती अॅग्रो व विघ्नहर या कारखान्यांचीही बिले थकीत असल्याचे साखर आयुक्तालयाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दौंड शुगरकडे ५११ लाख रुपये, पराग कारखान्याकडे २५४ लाख रुपये, माळेगाव कारखान्याकडे १६८८ लाख रुपये थकीत आहेत.


















