कोल्हापूर : राज्यातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी उत्पादनात आघाडी घेतली आहे. 7 एप्रिलपर्यंत राज्यातील 210 साखर कारखान्यांनी एकूण 10 कोटी 44 लाख 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 9 कोटी 90 लाख 30 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.48 टक्के राहिला आहे. यापैकी 191 कारखान्यांनी हंगाम संपवून गाळप बंद केले असून 19 कारखाने अद्याप सुरू आहेत. साखर उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रातील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जरंडेश्वर शुगर मिल्स यांनी राज्यात आघाडी घेतली. तर रिकव्हरीमध्ये दत्त इंडिया प्रा. लि. (ता. फलटण) ने 17.74 टक्क्यांसह निर्विवाद वर्चस्व राखले.
सहकारी कारखान्यांचे वर्चस्व
गाळपाच्या प्रमाणात खाजगी आणि सहकारी कारखान्यांचे योगदान जवळपास समान असले तरी एकूण कामगिरीत सहकारी साखर कारखान्यांनी वरचष्मा राखला आहे. ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उतारा या तिन्ही बाबींमध्ये सहकारी कारखाने खाजगी कारखान्यांपेक्षा सरस ठरले. संख्येने खाजगी कारखाने अधिक (107 विरुद्ध 103) असूनही गाळप आणि उत्पादनात सहकारी क्षेत्राने बाजी मारली. साखर उताऱ्यातही सहकारी कारखान्यांनी जवळपास एक टक्क्याची आघाडी घेतली.
२९ कारखान्यांना थकीत एफआरपीबाबत नोटिसा
हंगाम 2025-26 मधील सुमारे 1,012 कोटी रुपयांच्या थकीत एफआरपी प्रकरणी साखर आयुक्तालयाने 29 साखर कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या संदर्भात साखर संकुल येथे 13 तारखेला सकाळी 11.30 वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. 31 मार्च 2026 अखेर 80 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या 53 कारखान्यांची यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी 24 कारखान्यांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित 29 कारखान्यांना आता नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
आरआरसी कारवाईचा इशारा
या 29 कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देय असलेली एफआरपी रक्कम 3,074 कोटी 33 लाख रुपये इतकी होती. त्यापैकी 2,061 कोटी 89 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून 1,012 कोटी 44 लाख रुपये अद्याप बाकी आहेत. ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस पुरवठ्यानंतर 14 दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास 15 टक्के व्याज आकारले जाऊ शकते. आवश्यक असल्यास महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हानिहाय एफआरपी थकविलेल्या कारखान्यांची संख्या
थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर 3, सांगली 2, सोलापूर 3, सातारा 1, नाशिक 1, परभणी 2, छत्रपती संभाजीनगर 3, लातूर 2, धाराशिव 3, जालना 1, नांदेड 1, हिंगोली 1, पुणे 1, नंदुरबार 1, अहिल्यानगर 1 आणि बीड जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांचा समावेश आहे.


















